यशवर्धन दलालच्या नाबाद 428 धावांच्या खेळीमुळे विक्रमी ठरलेल्या 23 वर्षाखालील मुलांच्या कर्नल सी. के. नायुडू करंडक स्पर्धेत हरयाणाने बलाढय़ मुंबईचा डाव आणि 400 धावांनी महापराभव केला. यशवर्धनने अर्श रंगासह सलामीसाठी 410 धावांची विक्रमी भागी रचताना हरयाणाला 8 बाद 742 धावांचा हिमालय रचून दिला होता. त्यानंतर पार्थ वत्स आणि पियूष दहिया यांच्या भेदक माऱयापुढे मुंबईचे दोन्ही डाव 162 आणि 180 धावांत गुंडाळत डाव आणि 400 धावांचा महाप्रचंड विजय नोंदवला. मुंबईने याआधी गेल्या महिन्यात मध्य प्रदेशचा 7 विकेटनी तर बडोद्याचा 4 विकेटनी पराभव करत सलग विजय नोंदवले होते. मात्र या सामन्यात मुंबईच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी सर्वांचीच घोर निराशा केली