रणजीला नवा चॅम्पियन लाभणार की… आजपासून केरळ आणि विदर्भ यांच्यातील रणजीच्या ब्लॉकबस्टर फायनलला प्रारंभ

यंदाच्या 90 व्या रणजी मोसमातील अपराजित विदर्भ आणि केरळ हे दोन्ही संघ जेतेपदासाठी जामठावर भिडणार आहेत. विदर्भ आपल्या घरच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे त्याचे पारडे निश्चितच जड मानले जात असले तरी नशीब घेऊन खेळत असलेला नव्या दमाचा केरळ जबरदस्त फॉर्मात आहे. केरळचा खेळ पाहता रणजीला नवा चॅम्पियन लाभणार असल्याची हवा आहे. मात्र विदर्भ आपल्या तिसऱ्या जेतेपदासाठी सज्ज आहे.

रणजी करंडकाच्या उपांत्य सामन्यात विदर्भाने मुंबईचा पराभव करून आपल्या गत पराभवाचा वचपा काढत अंतिम फेरीत चौथ्यांदा आपले नाव लिहिले, पण दुसरीकडे केरळने अनपेक्षितपणे अवघ्या दोन धावांच्या आघाडीच्या जोरावर गुजरातला अंतिम फेरीच्या शर्यतीत मागे टाकले. हा सामना पाहून देवभूमी केरळवर त्यांचे नशीब खूप खूश असल्याचा अनुभव आला. याआधी उपउपांत्य फेरीच्या सामन्यातही त्यांनी जम्मू-कश्मीरविरुद्ध अवघ्या एका धावेच्या आघाडीवर उपांत्य फेरी गाठण्याचा चमत्कार केला होता. त्यामुळे केरळ काहीही चमत्कार घडवू शकतो.

विदर्भ-केरळ अपराजित

या मोसमात मोजकेच संघ अपराजित राहिलेत, त्यापैकी अंतिम फेरीपर्यंत विदर्भ आणि केरळ पोहोचलेत. विदर्भाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हा संघ चक्क सर्वाधिक आठ सामने जिंकला आहे. साखळीत तर सलग सहा सामने जिंपून त्यांनी विजयाचा षटकारही ठोकला होता, मात्र अखेरचा साखळी सामना अनिर्णितावस्थेत सुटल्याने त्यांच्या सलग विजयाची मालिका खंडित झाली. त्यानंतर दोन्ही सामने जिंकत ते अंतिम फेरीत पोहोचलेत. याउलट केरळचा संघ केवळ तीन विजय मिळवत इथपर्यंत पोहोचलाय. त्यांचा हा प्रवास फारच आश्चर्यकारक ठरला आहे. ते विजयापेक्षा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर अंतिम फेरीत पोहोचलेत.

आगळावेगळा अंतिम सामना

गेली अनेक वर्षे रणजीला नवा विजेता लाभलेला नाही. 2017-18 च्या मोसमात विदर्भने आपले पहिलेवहिले जेतेपद पटकावत रणजी विजेत्यांच्या यादीत आपले नाव कोरले होते. म्हणजेच गेली आठ वर्षे रणजी करंडकाला नवा विजेता लाभलेला नाही. यादरम्यान गेल्या आठ वर्षांच्या काळात विदर्भ चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारतोय. आता विदर्भानंतर केरळ नव्या विजेत्याच्या शर्यतीत आहे. केरळ आपल्या रणजी करंडकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत पोहोचलाय. रणजी करंडकातून केरळचे फारच कमी खेळाडू हिंदुस्थानी संघात पोहोचलेत. केरळचे क्रिकेट म्हणजे एस. श्रीशांत आणि संजू सॅमसन ही मोजकीच नावे समोर येतात.

विदर्भच बलशाली

अंतिम सामन्यापर्यंतची कामगिरी पाहाता अक्षय वाडकरचा विदर्भच बलशाली दिसतोय. त्यांनी आपली ताकद वेळोवेळी दाखवून दिलीय. त्याचे गोलंदाज असो किंवा फलंदाज सारेच फॉर्मात आहेत. मग तो शौरी असो किंवा मालेवार, सारेच संघाला जेतेपद जिंपून देण्यास उत्सुक आहेत. विदर्भच्या तुलनेत केरळ काहीसा कमपुवतच आहे, पण कर्णधार सचिन बेबी आणि आदित्य सरवटेच्या कामगिरीने त्यांच्या आव्हानाला बळकटी दिली आहे. संघ कोणताही बलाढय़ असो, जो मैदानात उतरल्यावर आपला खेळ दाखवतो तोच विजयी ठरतो. सध्या विदर्भ खेळात तर केरळ आपल्या दैवाबाबतीत पुढे आहे. खेळ जिंकतो की दैव ते उद्यापासून कळेलच.