टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावसकर मालिकाही गमवावी लागली. त्यामुळे बीसीसीआयने प्रमुख खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सक्ती केली. त्यानुसार अनेक बडे खेळाडू रणजी स्पर्धेत उतरले. कर्णधार रोहित शर्माही तब्बल 10 वर्षानंतर रणजीच्या मैदानात उतरला. पण रोहितचे कमबॅक फुसका बारच ठरला असून जम्मू-कश्मीरविरुद्धच्या लढतीत तो स्वस्तात बाद झाला. रोहित 19 चेंडूत 3 धावा काढून बाद झाला.
मुंबई आणि जम्मू-कश्मीरमधील रणजी सामना गुरुवारपासून सुरू झाला. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा ही जोडी मुंबईकडून सलामीला आली. मात्र दोघेही एकेरी धावसंख्येवर बाद झाले. यशस्वीने 4, तर रोहितने 3 धावा केल्या. हे दोघेही स्वस्तात बाद झाले असले तरी या जोडीने रणजी स्पर्धेत नवा इतिहास लिहिला आहे.
यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा ही जोडी मुंबईकडून सलामीला उतरली. या दोघांनी मैदानात पाऊल ठेवताच इतिहास रचला. रणजीमध्ये एकाच संघाकडून सलामीला येणारी टीम इंडियाचे हे पहिले सक्रिय सलामीवीर आहेत. दोघेही टीम इंडियाकडून कसोटीला सलामीला खेळतात आणि आता एकाच रणजी संघाकडूनही दोघे सलामीला आले.
17 वर्षानंतर असं घडलं
रोहित शर्मा रणजी स्पर्धेत खेळणारा गेल्या 17 वर्षातील पहिलाच कर्णधार आहे. याआधी अनिल कुंबळे हा 2008 मध्ये महाराष्ट्र संघाकडून रणजी खेळला होता. त्यावेळी तो टीम इंडियाच्या कसोटी संघाताही कर्णधार होता.
लंचपर्यंत मुंबईचे 7 खेळाडू बाद
दरम्यान, जम्मू-कश्मीरविरुद्ध मुंबईचा संघ चाचपडताना दिसत आहे. लंचपर्यंत मुंबईने 7 खेळाडू गमावून 110 धावा केल्या आहेत. शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियान ही अष्टपैलू जोडी मैदानात नांगर ठोकून आहे. तत्वूर्वी रोहित 4, यशस्वी 3, हार्दिक तमोरे 7, अजिंक्य रहाणे 12, श्रेयस अय्यर 11, शिवम दुबे आणि शम्स मुलानी शून्यावर बाद झाला.