![_ranji trophy](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/ranji-trophy--696x447.jpg)
अजिंक्य रहाणेच्या शतकानंतर मुंबईची झालेली पडझड आणि त्यानंतर मुंबईच्या 354 धावांचा पाठलाग करणाऱया हरयाणाची शार्दुल ठाकूर आणि रॉय डायसच्या माऱयापुढे उडालेली दाणादाण निर्णायक ठरली. हरयाणाचा दुसरा डाव 201 धावांत गुंडाळून मुंबईने 152 धावांच्या मोठया विजयासह 43 व्या रणजी जेतेपदाच्या दिशेने सुस्साट धाव घेतली आहे. आता येत्या 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान नागपूरच्या जामठा येथे मुंबईची उपांत्य लढत विदर्भशी पडेल. तसेच जम्मू-कश्मीर आणि केरळ यांच्यातील विजेत्या संघाशी गुजरातचा संघ भिडेल.
मुंबईने सोमवारीच आपला उपांत्य फेरीतील प्रवेशाचा मार्ग सुखकर केला होता. सोमवारच्या नाबाद असलेल्या अजिंक्य रहाणेने आपल्या हुकणाऱया शतकांचा सिलसिला खंडित करताना अखेर आपल्या 41 व्या शतकावर शिक्कामोर्तब केले, मात्र रहाणे बाद होताच मुंबईच्या डावाला नजर लागली. रहाणेने शिवम दुबेच्या साथीने 85 धावांची भागी रचत मुंबईची आघाडी तीनशेपलीकडे नेली, मात्र अनुज ठकरालने 108 धावांवर अजिंक्यची खेळी संपवल्यानंतर मुंबईच्या उर्वरित पाच फलंदाजांना बाद करायला फार वेळ लागला नाही. अवघ्या 22 धावांत मुंबईचे पाच फलंदाज धडाधड बाद झाले आणि 4 बाद 314 अशा सुस्थितीत असलेल्या मुंबईचा डाव 339 धावांतच संपला. मुंबईचे सहा फलंदाज 22 धावांतच गडगडले. आतापर्यंत मुंबईच्या डावाला सावरणाऱया तळाच्या फलंदाजांना दोनअंकीही धावसंख्या गाठता आली नाही. ठकरालने 70 धावांत 4 विकेट टिपल्या.
ठाकूर-डायसने केली हरयाणाची वाताहत
354 धावांचे जबरदस्त आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या हरयाणाला पुढील पाच सत्रांत हा टप्पा गाठायचा होता. पण यंदाच्या मोसमात सुपरफास्ट कामगिरी करणाऱया शार्दुल ठाकूरने पहिल्या डावात 134 धावांची खणखणीत खेळी करणाऱया कर्णधार अंकित कुमारला पायचीत करून हरयाणाचे कंबरडेच मोडले. आधारस्तंभच बाद झाल्यामुळे हरयाणवी फलंदाजांचे मनोधैर्यच खचले. सलामीवीर लक्ष्य दलालने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण रॉय डायस आणि शार्दुल ठाकूरने हरयाणाची मधली फळी उद्ध्वस्त करत 5 बाद 60 अशी अवस्था करत आपला उपांत्य फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्चित केला.
दलाल-सुमितने रंगत आणली
चहापानाच्या आधी हरयाणाचा अर्धा संघ 60 धावांतच आटोपल्यामुळे मुंबईला चौथ्याच दिवशी विजयाची नामी संधी होती. मात्र त्यानंतर सलामीवीर लक्ष्य दलाल आणि सुमित कुमारने मुंबईचे आक्रमणाला थोपवत संघाला दीडशतकापर्यंत नेले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 90 धावांची भागी रचत दलाल-सुमितने सामन्यात रंगत आणली. पण तनुष कोटियनने ही जोडी फोडताना दलालला (64) बाद केले. यानंतर हरयाणाच्या डावाला गुंडाळायला डायसला फार वेळ लागला नाही. डायसने सुमितला (62) बाद केले. पुढे जयंत यादवने 27 धावा ठोकून संघाला द्विशतक गाठून दिले. तोच सर्वात शेवटी बाद झाला आणि मुंबईने दीडशतकी दिमाखदार विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली.
विदर्भ, गुजरातचे मोठे विजय
यंदाच्या रणजी मोसमात साखळीत सलग सहा विजयांची नोंद करणाऱ्या विदर्भन तामीळनाडूचा 198 धावांची पराभव करत सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली. गेल्या वर्षी ते जेतेपदाच्या लढतीत मुंबईविरुद्ध हरले होते. यंदा त्यांना त्या पराभवाची परतफेड करण्याची नामी संधी आहे. विदर्भच्या 401 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तामीळनाडूचा दुसरा डाव 202 धावांवर आटोपला. तसेच गुजरातने सौराष्ट्रचा १९७धावांत फडशा पाडत डाव आणि ९८ धावांच्या दणदणीत विजयासह उपांत्य फेरी गाठली गुजरातने जयमीत पटेल (103) आणि उर्विल पटेल (140) यांच्या शतकाच्या जोरावर 511 धावांचा डोंगर उभारत 295 धावांची प्रचंड आघाडी घेतली होती.
जम्मू-कश्मीर आणि केरळ यांच्यात अटीतटीची झुंज
अत्यंत थरारक अवस्थेत असलेल्या या सामन्यात केरळने अवघ्या 1 धावेची आघाडी घेतली होती. त्यानंतर कर्णधार पारस डोग्राच्या 132 धावा आणि त्याला लाभलेल्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या अप्रतिम साथीमुळे जम्मू-कश्मीरने 9 बाद 399 धावांवर आपला डाव घोषित केला. त्यामुळे केरळपुढे विजयासाठी 399 धावांचे कठीण लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना केरळने दिवसअखेर 2 बाद 100 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी 299 धावांची गरज आहे. केरळचा संघ गेल्या सहा दशकांपासून रणजी करंडक खेळत असून 2019 साली त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर ते उद्या जम्मू-कश्मीरला हरवण्यात यशस्वी ठरले तर दुसऱयांदा हा पराक्रम करतील. तसेच जम्मू-कश्मीरलाही प्रथमच उपांत्य फेरीत धडक मारण्याची संधी लाभली आहे. त्यामुळे कोणता संघ पराक्रम करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.