अन् विराट बाद होताच मैदानात सन्नाटा

वार शुक्रवार, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम रणजी सामन्यात हिंदुस्थानचा स्टार फलंदाज विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी खचाखच भरले होते. अखेर तो क्षण आला… विराट मैदानात उतरताच दिल्लीकरणांनी ‘विराट-विराट’ च्या घोषणा देत परिसर दणाणून टाकला. रणजीमध्ये पुनरागमन करणाऱया विराट 15 चेंडू खेळला, मात्र रेल्वेच्या वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानने टाकलेल्या सुरेख चेंडूवर विराट त्रिफाळाचीत झाला आणि दिल्लीकरांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर झाला. ऑफ स्टंप बाहेरच्या चेंडूने ऑस्ट्रेलियाप्रमाणे रणजीमध्येदेखील विराटचा घात केला. तो अवघ्या 6 धावांवर बाद झाला. आज त्याची फलंदाजी पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने जमा झालेल्या क्रिकेटप्रेमींची दांडीही सांगवानने गुल केली. कोहली बाद होताच जेटली स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला. 12 वर्षांनंतर विराट रणजी सामना खेळणार असल्यामुळे गुरुवारपासून दिल्लीकरांनी मैदानात प्रचंड गर्दी केली होती. आज सकाळी 6 वाजल्यापासूनच मैदानाच्या गेटबाहेर प्रेक्षकांनी रांगा लावण्यास सुरुवात केली होती.