विराट कोहली आणि ऋषभ पंत सध्या खराब कामगिरीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहेत. देशांतर्गत क्रिकेट खेळत नसल्याने त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. परंतु आता हे दोघेही रणजी ट्रॉफी 2024-25 हंगामात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली आणि ऋषभ पंत यांचा समावेश करण्यात आला आहे.
दिल्लीच्या संघाचे रणजी ट्रॉफीमधील दोन सामने अद्याप बाकी आहेत. 23 जानेवारी पासून दुसरा राऊंड सुरू होणार आहे. दिल्लीचा सामना सौराष्ट्रविरुद्ध होणार आहे. तसेच दिल्लीचा साखळी फेरीतील शेवटचा सामना 30 जानेवारी पासून रेल्वेविरुद्ध सुरू होईल. दरम्यान, दिल्लीच्या संघाने या दोन सामन्यांसाठी 41 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच बरोबर नवदीप सैनी आणि हर्षित राणा यांचा सुद्दा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विराट आणि ऋषभ पंत दिल्लीसाठी रणजी ट्रॉफी खेळताना दिसण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने शेवटचा रणजी सामना 2012 साली खेळला होता. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. तसेच ऋषभ पंतने 2017-18 च्या हंगामात रणजी ट्रॉफी खेळली होती.