
मुंबई क्रिकेटला गेली चार दशके एकापेक्षा एक खेळाडू निवडून देणारे निवड समिती सदस्य, अस्सल मुंबईकर रणजीपटू, मुंबई क्रिकेटचे मार्गदर्शक असलेल्या मिलिंद रेगे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
वयाच्या 26 व्या वर्षीच त्यांना क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा धक्का बसला होता, पण त्यानंतरही ते पुन्हा मैदानात परतले आणि मुंबई क्रिकेटचे नेतृत्वही सांभाळले. दहा वर्षे मुंबईसाठी खेळणाऱ्या रेगे यांनी 52 प्रथम श्रेणी सामन्यांत आपल्या फिरकीवर 126 विकेट टिपल्या, तर फलंदाजीतही चमक दाखवताना 1532 धावा केल्या होत्या. रेगे यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांचे मित्र असलेल्या सुनील गावसकर, रवी शास्त्राr, सचिन तेंडुलकर यांच्यासह असंख्य क्रिकेट दिग्गजांनी आपल्या आठवणी जागवत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. उद्या गुरुवारी सकाळी 9.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.