
वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर आपल्याला आली होती, तसेच परळीमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असा खळबळजनक दावा करणारे निलंबित पोलीर उपनिरीक्षक रणजित कासले यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील स्वारगेट भागामध्ये असणाऱ्या हॉटेलमधून शुक्रवारी पहाटे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाल्मीक कराडप्रमाणे रणजित कासले हे देखील आत्मसमर्पण करणार होते, मात्र नाचक्की टाळण्यासाठी पोलिसांनीच त्यांना ताब्यात घेतले आणि आता त्यांना बीडला घेऊन रवाना झाले. रणजित कासले यांना दुपारच्या सुमारास न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी रणजित कासले यांनी आपण आत्मसमर्पण करणार असल्याचे जाहीर केले होते. मी वीस वर्षे सायबर पोलीस दलात काम केले आहे. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही. मी दररोज दोन गाड्या वापरून लोकेशन बदलत आहे. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही, असा दावा करणारा बीड पोलीस दलातील निलंबित अधिकारी रणजित कासले याने पोलिसांसमोर शरणागती पत्करणार असल्याचे जाहीर केले होते.
गुरुवारी दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर कासले यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी परळीत ईव्हीएममझध्ये छेडछाड झाल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर शुक्रवारी पहाटेच कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलवर बीड पोलिसांचे पथक धडकले आणि त्यांना ताब्यात घेतले.