सीमा भागातील मराठी भाषिक गेली 65 वर्षे भळभळती वेदना घेऊन उभे आहेत; रंगनाथ पठारे यांची खंत

एकभाषिक समाज एकत्र राहावा हा भाषावार प्रांतरचनेचा मूलभूत सिद्धांत होता. मात्र याबाबतीत दीर्घकाळ गोंधळाची व संघर्षाची परिस्थिती राहिली असून सीमा भागातील मराठी भाषिक लोक गेली 64 ते 65 वर्षे सीमा प्रश्नाची भळभळती वेदना घेऊन उभे आहेत, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक व अभिजात भाषातज्ञ समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली.

सातारा जिह्यातील गुंफण अकादमी व खानापूर (जि. बेळगाव) येथील शिवस्वराज जनकल्याण फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर येथे आयोजित 20व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून पठारे बोलत होते. याप्रसंगी आमदार विठ्ठलराव हलगेकर, अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष निरंजन सरदेसाई, अकादमीचे सीमा भागाचे समन्वयक गुणवंत पाटील, गोव्यातील कवयित्री चित्रा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रंगनाथ पठारे म्हणाले, एकभाषिक समाज एकत्र राहावा हा भाषावार प्रांतरचनेचा मूलभूत सिद्धांत होता. एकभाषिक समाज एकत्र असेल तर त्यांना त्यांचे व्यवहार आनंदाने करता येतील, दुसऱया भाषेचा आदर करता येईल. सीमा भागाचा हा परिसर निसर्गाने नटलेला असून रमणीय व सुंदर आहे. पण याच सौंदर्यामुळे दोन्ही राज्यांना या भागाचे आकर्षण आहे. त्यात या प्रदेशाचे हाल होत आहेत. मुलांना मातृभाषेऐवजी अन्य भाषेतून शिकविणे ही मेंदूची वाढ व विकास थांबविणारी प्रक्रिया आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.