मेडिकल कॉलेजच्या लिफ्टमध्ये ज्युनियर डॉक्टरचा विनयभंग, आरोपीला अटक

झारखंडमधील रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) येथील ऑन्कोलॉजी विभागातील एका कनिष्ठ निवासी डॉक्टरचा रविवारी कामावर जाताना हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आला. FIR दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

या घटनेनंतर डॉक्टरांनी संपाची घोषणा केली. मात्र, ज्युनिअर डॉक्टर्स असोसिएशन (JDA) आणि RIMS व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर व्यवस्थापनाने डॉक्टरांना वाढीव सुरक्षेचे आश्वासन दिल्याने संप मागे घेण्यात आल्याचं वृत्त आहे.

प्रत्येक लिफ्टसाठी लिफ्ट ऑपरेटर नेमण्याचे आणि प्रत्येक प्रभागात सशस्त्र पोलीस अधिकारी तैनात करण्याचे त्यांनी मान्य केले. किमान 100 सशस्त्र पोलीस आवारात तैनात असतील, असे आश्वासन देखील व्यवस्थापनाकडून देण्यात आले.

ही घटना कोलकातातील आरजी कार हॉस्पिटल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर घडली आहे. कोलकाता येथे 9 ऑगस्ट रोजी एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी डॉक्टर रस्त्यावर उतरल्याने देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली.

RIMS मधील कनिष्ठ डॉक्टरांनी देखील RG कार घटनेचा निषेध केला होता, चांगली सुरक्षा आणि वैद्यकीय संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी केली होती.