झारखंडची राजधानी रांचीमध्ये एक विचित्र घटना पाहायला मिळाली. बरियातू पोलीस स्टेशन हद्दीतील राणीबागान परिसराचे रातोरात स्माशानभूमीत रुपांतर झाले. येथे काही अज्ञातांनी राणीबागान परिसारातील रस्त्याच्या मधोमध एक मृतदेह पुरला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रांचीच्या लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 3 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. परिसराती स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जानेवारीला दुपारच्या सुमारास 40 ते 50 अज्ञात लोक एका व्यक्तीचा मृतदेह घेऊन आले. आणि त्यांनी रस्त्याच्या मधोमध तो मृतदेह पुरला. यानंतर त्यांनी त्या जागी काही लाकडेही ठेवली आणि तेथून निघून गेले. सदर घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर तेथील स्थानिकांनी बरियातू पोलीस ठाण्यात या प्रकराबाबत तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी मृतदेह पुरण्यात आलाय ती जमीन आदिवासी लोकांची आहे. आदिवासी जातीचे लोक त्यांच्या लोकांचे मृतदेह आपल्याच मालकीच्या जमिनीत पुरतात. अशी त्यांची प्रथा आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. रहदारीच्या रस्त्यावर अशाप्रकारे मृतदेह पुरणे चूकीचे आहे. त्यामुळे या प्रकरणावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.