मित्रपक्षांनी एकाच मतदारसंघात उमेदवार दिले असतील तर चर्चा करून मागे घेणार

महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मैत्रीपूर्ण लढतीही कुठे होणार नाही. एकाच मतदारसंघात आघाडीतील दोन पक्षांकडून उमेदवार दिला गेला असेल तर चर्चा करून दोन दिवसांत मागे घेतला जाईल, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज स्पष्ट केले.

टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रमेश चेन्नीथला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही, वाद असेल तर तो महायुतीमध्ये आहे असे चेन्नीथला म्हणाले. मिंधे गट आणि अजित पवार गटाच्या जागांवर उमेदवार देऊन भारतीय जनता पक्षाने हे दोन्ही गट संपवण्याची सुरुवात केली आहे, असेही चेन्नीथला म्हणाले.

चेन्नीथला यांनी मिंधे सरकारच्या भ्रष्टाचारावरही यावेळी टीका केली. मिंधे सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून सरकारने दोन वर्षे महाराष्ट्राला लुटण्याचेच काम केले आहे, असे ते म्हणाले. सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लाडकी बहीण योजना बंद पडली असल्याचाही आरोप त्यांनी केला. भाजप युतीचे भ्रष्ट सरकार जाऊन जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करणारे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस ब्रीज दत्त आदी उपस्थित होते.

राहुल गांधी 6 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत 6 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीची गॅरेंटी म्हणजेच जाहीरनामा घोषित केला जाणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या 6 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या दिवशी सकाळी नागपूर येथे आयोजित संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत आणि सायंकाळी त्यांच्या उपस्थितीत मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची गॅरेंटी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली.

मिंधे सरकारने 10 लाख नोकऱ्या गुजरातमध्ये घालवल्या

देवेंद्र फडणवीस कितीही दावा करत असले तरी राज्यात येणारे 9 लाख कोटींचे प्रकल्प आणि सुमारे 10 लाख नोकऱ्या मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेल्या, असे याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग प्रकल्पही गुजरातने पळवला, असे ते म्हणाले. मिंधे सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढाही त्यांनी वाचला.