
आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणाऱ्या ‘लव्ह जिहाद’ सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी महायुती सरकारने पावले उचलली आहे. सरकारने पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमली आहे. ही समिती अन्य राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधी तसेच सक्तीच्या अथवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतर विरोधी कायद्यांचा अभ्यास करून कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करणार आहे. मात्र यास महायुतीतील घटकपक्ष असलेल्या रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. ‘लव्ह जिहाद’ या शब्दावरच त्यांनी आक्षेप घेतला आहे.
शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी आपला लव्ह जिहाद कायद्याला विरोध असल्याचे म्हटले. ते म्हणाले, लव्ह जिहाद कायद्याला माझा विरोध आहे. हिंदू-मुस्लिम मुलं-मुली एकत्र आली की त्यास लव्ह जिहाद म्हणणे योग्य नाही. दलित आणि सवर्णही एकत्र येतात. मुलं-मुली एकत्र येतात आणि लग्नही करतात. त्यामुळे हिंदू-मुस्लिम लग्न झाले की त्याला लव्ह जिहाद म्हणणे चुकीचे आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
मी लव्ह जिहाद संकल्पनेची सहमत नाही, मात्र लग्नानंतर धर्मांतर होऊ नये म्हणून कायद्यात तरतूद असावी असे स्पष्ट मत आठवले यांनी व्यक्त केले. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींच्या जबरदस्तीने धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे. धर्मांतर करून घेणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, असेही ते म्हणाले. त्याआधी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले होते.
आंतरधर्मीय विवाहामध्ये काहीही गैर नाही. मात्र फसवणूक करून आणि ओळख लपवून लग्न करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने याबाबत एक जीआर जारी केला असून पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती अन्य राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधी तसेच सक्तीच्या अथवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतर विरोधी कायद्यांचा अभ्यास करून कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करेल, असे फडणवीस यांनी म्हटले होते.