संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार आहेत. महाराष्ट्र पोलिसांसाठी हे चांगले नाही. आरोपी ताब्यात घेण्यास एवढा वेळ कसा? असा सवाल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही आठवले म्हणाले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही घटना राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी असल्याचे म्हटले. पवनचक्की कार्यालयात झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असता तर कदाचित ही घटना टळली असती. पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही शंका घेण्यास जागा आहे. त्यांना अजून तीन आरोपी सापडलेले नाहीत. पोलिसांनी दबावाखाली काम करणे योग्य नसल्याचेही रामदास आठवले म्हणाले.
पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला असा स्पष्ट आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. सोमनाथला कोणताही आजार नसल्याचे त्याच्या आईने सांगितले आहे. तो दगडफेकीतही नव्हता. त्यामुळे मारकुट्या पोलिसांवर कारवाई होणारच असेही आठवले यांनी सांगितले.
आता मी जाऊन एका एकाला मारून येते, संतोष देशमुख यांच्या पत्नीचा टाहो
‘देवासारख्या माझ्या पतीला त्यांनी अतिशय क्रूरपणे मारले. आम्हाला काय वेदना होताहेत, ते आमच्या जिवाला माहितीय. आरोपींना पकडण्यासाठी इतका वेळ का लागतोय? आता आमचा संयम संपत चाललाय. आता मी जाऊन एका एकाला मारून येते, मला वेदना असह्य होतायत. एवढी सध्या माझ्यात हिम्मत आलीय. माझ्या लेकरांनी काय चूक केली होती? त्यांचा असा वनवास का केला?’ असा टाहो संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्वनी यांनी आठवले यांच्यासमोर फोडला.