धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे विधान

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा जीवश्च कंठश्च वाल्मीक कराडच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा स्पष्ट उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही आता यावर स्पष्ट बोलत आहेत. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही यावर भाष्य केले असून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे ते नाशिक येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे रविवारी नाशिकच्या काळाराम मंदिरात दाखल झाले होते. काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त त्यांनी अभिवादन केले आणि त्यांच्या उपस्थितीत मंदिराच्या बाहेर सामूहिक धम्म वंदना झाली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार आहेत, असा गौप्यस्फोट करुणा मुंडे यांनी केला. यावर विचारले असता रामदास आठवले म्हणाले की, करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे काय संबंध आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना काय माहिती मिळाली याबाबत मला माहिती नाही. पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांचा खून करण्यात आल्याची माहिती सीआयडीला मिळाली आहे.

अजित पवारांनी लिहून घेतलंय, धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा! करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण

धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडचा जवळचा संबंध होता. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून अजितदादांनी त्याचा विचार करणे आवश्यक आहे. नैतिकतेपुढे मंत्रीपद मोठे नाही. खुनाच्या प्रकरणात मुंडेंचा संबंध नाही, पण आरोपी त्यांच्या जवळचा होता. त्यामुळे नितिमत्तेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. याचा निर्णय अजित पवारांनी घ्यावा, असे आठवले म्हणाले.