उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बरळलेल्या नीलम गोऱ्हे यांची रामदास आठवले यांनी उडवली खिल्ली

उद्धव ठाकरे यांना एवढ्या मर्सिडीज गाड्यांची आवश्यकता आहे असे वाटत नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज नीलम गोऱ्हे यांच्या बेताल वक्तव्याची खिल्ली उडवली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले सोलापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्राम गृहात त्यांचे पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना रामदास आठवले असं म्हणाले आहेत.

रामदास आठवले म्हणाले की, ”नीलम गोऱ्हे या माझ्या पक्षात होत्या. त्यांना आमदारकी मिळाली नाही म्हणून त्या शिवसेनेत गेल्या. शिवसेनेमध्ये त्यांनी अनेक पदे मिळवली.” रामदास आठवले म्हणाले की, संजय राऊत हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असतात, ते पत्रकार संपादक आहेत. ते त्यांच्या पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडत असतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणे योग्य नाही.”

आठवले म्हणाले, ”शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग केला होता. त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत होतो. मात्र आज काही राजकीय तडजोडीमुळे मी भाजपसोबत आहे.” ते म्हणाले, ”लोकसभा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आम्हाला योग्य जागा दिल्या नाहीत. याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यात नाराजीची भावना आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्हाला योग्य वाटा मिळेल, अशी आशा आहे.” महायुतीत रिपाईला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, अशी ही खंत त्यांनी व्यक्त केली. माझ्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज असले तरी ते पक्ष सोडून गेले नाहीत, माझ्यासोबतच आहेत, असेही रामदास आठवले म्हणाले.