फडणवीसच CM होणार, शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल तर त्यांनी केंद्रात जावं; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले. निकाल लागून तीन दिवस झाले तरी अद्याप मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेले नाही. मिंधे गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदावरून धुसफूस सुरू आहे. दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. मात्र आता मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांशी बोलताना आठवले यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिले नव्हते असेही स्पष्ट केले.

मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या धुसफूस बाबत विचारले असता रामदास आठवले म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असा स्पष्ट संदेश भाजप हायकमांडने एकनाथ शिंदे यांना दिला आहे. शिंदे नाराज असून ‘बिहार पॅटर्न’वर विचार करावा अशी त्यांची मागणी आहे. मात्र ‘बिहार पॅटर्न’वर विचार करण्याची वेळ निघून गेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे पुढील मुख्यमंत्री तुम्हीच असे कोणतेही आश्वासन एकनाथ शिंदे यांना देण्यात आले नव्हते. निवडणूक त्यांच्या नेतृत्वाल लढली जाईल अशी घोषणा करण्यात आली आणि त्यांच्याच नेतृत्वात लढलीही. महायुतीने मोठा विजय मिळवला. यात शिंदे यांच्यासह फडणवीस आणि अजित पवार यांचेही योगदान आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे मान्य करावे. महायुतीमध्ये फूट पडू देऊ नये. महाराष्ट्रासाठी ही बाब चांगली नाही.

तसेच मुख्यमंत्री असल्याने विधानसभा निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वात लढलो. त्यांची मागणी मान्य असली तरी भाजपचा याला पाठींबा नाही. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी सरकारमध्ये यावे, मंत्रीपद स्वीकारावे. शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावे. त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचे नसेल तर त्यांनी मोदी-शहांशी बोलावे. त्यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाऊ शकते, असेही आठवले म्हणाले.

मुख्यमंत्रीपदावरुन शिंदे-फडणवीसांमधील धुसफूस कॅमेऱ्यात कैद; एकमेकांकडे बघणंही टाळलं!