हिंदुस्थानी क्रिकेटला रत्नांसह भारतरत्न घडवून देणाऱ्या गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटविश्वातील दिग्गज शिष्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे अनावरण करण्यात आले.
आपल्या अद्भुत मार्गदर्शनामुळे क्रिकेटच्या रथी-महारथींना घडवणारे शिल्पकार रमाकांत आचरेकरांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या गेट क्रमांक 5 वर त्यांच्या स्मारकाची निर्मिती करण्यात आली. आचरेकर यांची कन्या विशाखा दळवी, सुनील रामचंद्रन आणि कामत मेमोरियल क्रिकेट संघ यांच्या पुढाकाराने या स्मारकाला संग्रहणीय रूप लाभले.
स्मारकात त्यांची ओळख बनलेली त्यांच्या टोपीसह अनेक गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. आपल्या गुरूंच्या कारकीर्दीला मानाचा मुजरा करण्यासाठी निर्माण केलेल्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्याला सचिन तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रवीण अमरे, पारस म्हांब्रे, समीर दिघे, संजय बांगर, बलविंदरसिंग संधू हे शिष्य उपस्थित होते आणि सर्वांनीच आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.