राम मंदिर हल्ल्याचा कट उधळला; हरयाणातून दहशतवाद्याला अटक

अयोध्येतील राम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला असून हरयाणातून आयएसआयकडून ट्रेनिंग घेतलेल्या एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि फरिदाबाद विशेष कृती दलाने संयुक्त कारवाई करत दहशतवादी कनेक्शन असलेल्या तरुणाला अटक केली. अब्दुल रहमान (19) असे या तरुणाचे नाव असून तो फैजाबाद येथील रहिवासी आहे, दरम्यान, या तरुणाकडून एक हॅण्ड ग्रेनेड जप्त करण्यात आले असून ते तत्काळ निकामी करण्यात आले.

अब्दुल हा राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची तयारी करत होता. तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. अब्दुल कट्टरवादी गटांशी जोडला गेला होता. त्याचे फैजाबादमध्ये मटणविक्रीचे दुकान असल्याची माहिती समोर आली आहे. राम मंदिराच्या उभारणीनंतर पाकिस्तानच्या आयएसआयने हिंदुस्थानात मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली होती. त्यानुसार राम मंदिर सर्वात पहिले लक्ष्य होते. दरम्यान, तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

राम मंदिराची रेकी केली

अब्दुलने अनेकदा अयोध्येतील राम मंदिराची रेकी केली होती. येथील सुरक्षा व्यवस्थेबद्दल त्याने इत्थंभूत माहिती मिळवली होती. तसेच ही माहिती त्याने आयएसआयशी शेअर केली होती. राम मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्यात येणार होता. परंतु, पोलिसांच्या कारवाईमुळे हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आला.

अशी झाली कारवाई

संशयित अब्दुल फैजाबादवरून ट्रेन पकडून आधी फरिदाबाद येथे पोहोचला. येथे त्याला एका हँडलरने हँड ग्रेनेड दिले. त्यानंतर तो ट्रेनने अयोध्या येथे पोहोचून राम मंदिरावर हल्ला करणार होता. याचा सुगावा सुरक्षा संस्थांना लागला. त्यानुसार गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाई करत रविवारी अब्दुल रहमानला ताब्यात घेतले. दरम्यान, तरुणाकडून मोबाईल आणि इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले असून त्यामाध्यमातून त्याचे नेटवर्क तपासण्यात येत आहे.