सृजन संवाद – सीतेचे चातुर्य

>> डॉ. समिरा गुजर जोशी

श्रीरामांनी वनातील सर्व राक्षसांचा नाश करण्याची जी प्रतिज्ञा केली आहे, त्याला आपला विरोध सीतेने किती समर्पक मुद्दे मांडून केला हे आपण आधीच्या लेखात पाहिले. त्याच चर्चेमध्ये वनवासात शस्त्र जवळ बाळगण्यातला धोका सांगण्यासाठी अरण्यकांडामध्ये सीतेने रामाला एक गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट फार मार्मिक आहे. एखादे ऋषी जेव्हा मोठय़ा प्रमाणावर तपसाधना करतात आणि आता त्यांना ब्रह्मलोकाची प्राप्ती होणार अशी चिन्हे दिसू लागतात तेव्हा त्यांना विचलित करण्यासाठी इंद्र कधी अप्सरा पाठवतो किंवा अन्य काही क्लृप्ती करतो हे आपण अनेक गोष्टींतून वाचले आहे. अशाच प्रकारची एक युक्ती इंद्राने केली आहे. एक ऋषी तपाला बसले होते. त्यांचे तप भंग पावावे म्हणून इंद्र वेष बदलून, योद्धा बनून त्यांना भेटायला आला. त्याने ऋषींच्या हाती ठेव म्हणून जपण्यासाठी एक सुंदर तलवार दिली. उत्तम धार असलेली, मुठीवर सुंदर नक्षीकाम केलेली अशी ती आकर्षक तलवार होती. त्याने ऋषींना सांगितले, ही तलवार आपण आपल्याजवळ सांभाळून ठेवा, मी नंतर येऊन घेऊन जाईन. या छोट्याशा कृतीचा परिणाम किती मोठा झाला ते पहा. आता ध्यान करताना त्या ऋषींचे लक्ष ध्यानात लागेनासे झाले. स्नानासाठी, कंदमुळे गोळा करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी आश्रम सोडून बाहेर जायचे ठरले तर ते तलवार बरोबर घेऊन जाऊ लागले. कारण आपल्या पाठीमागे कुणी ही तलवार घेतली तर, अशी सतत धास्ती त्यांना वाटू लागली मग हळूहळू नुसती तलवार बरोबर असण्याचा काय उपयोग? तिचा आपण वापरही केला पाहिजे असे त्यांना वाटू लागले आणि पाहता पाहता त्या ऋषींची वृत्ती पालटून ते क्रूर वृत्तीचे बनले आणि थोड्याच दिवसांत नरकाचे अधिकारी ठरले. अशा प्रकारे इंद्राची योजना सफल झाली. ही गोष्ट सीतेने रामाला वनवासात अकारण शस्त्र बरोबर बाळगू नये हा आपला मुद्दा स्पष्ट करताना उदाहरण म्हणून सांगितली आहे. अकारण शस्त्र जवळ बाळगल्यामुळे एखाद्या तपसाधना करणाऱ्या ऋषीची वृत्ती ही इतकी बदलू शकते. मग वनवासामध्ये आपण कुणाचा तरी नाश करण्याच्या भावनेने (ते राक्षस का असेनात!) शस्त्र बाळगणे हे शहाणपणाचे आहे का, असा तिचा प्रश्न आहे. तिने सांगितलेल्या या गोष्टीवरूनच तिच्या चातुर्याची साक्ष आपणास पटते. ‘अपराधं विना हन्तुं लोकान् वीर न कामये- एखाद्याने अपराध केल्याशिवाय त्याला मारणे वीराला शोभत नाही, असे ती सांगते. पुन्हा हे सांगताना ती आवर्जून हेही म्हणते की, हे बोलणे प्रेमापोटी आले आहे हे समजून घे. मी तुम्हाला उपदेश करते आहे किंवा काही शिकवू पाहते आहे असे कृपया समजू नका.

श्रीरामांनीही तिच्या या बोलण्याचे कौतुक केले. आपल्या प्रिय व्यक्तीलाच आपण इतक्या पोटतिडकीने काही समजावू पाहतो, अन्यथा नाही हे तेही जाणून आहेत, पण ऋषींच्या यज्ञात राक्षस अडथळे आणत आहेत ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत मी केवळ वनवासात आहे म्हणून माझा क्षात्रधर्म बाजूला ठेवणे योग्य होणार नाही हे त्यांनी सीतेला समजावून सांगितले आहे. या ठिकाणी वाल्मीकींची सीता ही धर्म किंवा कर्तव्य याचा सूक्ष्म विचार करणारी आहे. तिचे वत्तृत्व कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. ती एक स्वयंप्रज्ञ तेजस्वी स्त्राr आहे. असाच आणखी एक प्रसंग आहे, जिथे तिच्या बाणेदारपणाचा आपणास अनुभव येतो. हा प्रसंग म्हणजे रावणाने कपटाने तिचे अपहरण करण्याचा प्रसंग होय. आपल्याला ठाऊक असल्याप्रमाणे ‘वाल्मीकी रामायणा’त या प्रसंगात रावण ब्राह्मण वेशात याचक बनून आला आहे. सीता त्याचे हे रूप खरे मानूनच त्याचे स्वागत करते आहे, पण अनेकदा आपल्याला वाल्मीकींनी लिहिलेल्या पुढील संवादाची कल्पना नसते. “तुम्ही कोण, कुठले, या वनात काय करत आहात?’’ असे प्रश्न सीतेने विचारल्यावर रावण तिला आपली खरी ओळख सांगतो आणि लंकेच्या वैभवाचे वर्णन करून “तू माझ्याबरोबर चल. या ऐश्वर्याची तू राणी होशील आणि रामालाही विसरशील’’ अशी थेट मागणी तिला घालतो. त्या वेळी तिने अत्यंत परखडपणे त्याला सांगितले आहे की, “तुझ्या लंकेतील ऐश्वर्याच्या बढाया मारू नकोस. स्वतला कुबेराचा भाऊ म्हणवतोस. (कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ होता.) त्याला सर्व देवही वंदन करतात अशी त्याची महती आहे आणि तू काय केलेस? अशा भावाला फसवून, लुबाडून तू त्याच्या मालकीची लंका हिसकावून घेतलीस आणि मला त्या लंकेचे प्रलोभन दाखवतो आहेस? अरे, एकवेळ इंद्राच्या पत्नीला पळवणारा जिवंत राहू शकेल, पण महापराक्रमी रामाच्या पत्नीला हात लावण्याचे धाडस करू नकोस. तुझा आणि राक्षस कुळाचा सर्वनाश होईल.’’ या उत्तरात तिने किती नेमकेपणाने रावणाला पेचात पकडले आहे हे लक्षात येते. इतक्या अवघड प्रसंगातही तिने आपल्या बोलण्यात अत्यंत चातुर्य दाखविले आहे. तिचे वत्तृत्व आणि धाडस दोन्ही दाद देण्यासारखे आहे. आजच्या मुलींना सक्षम आणि निर्भय होण्याचे धडे देत असताना सीतेच्या या तेजस्वी स्वरूपाचे दर्शन घडायला हवे.

[email protected]
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङ्मय अभ्यासक)