
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवरील अत्याचाराने गृहखात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच जळगावात मिंधे गटाच्या टवाळखोर कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. मुक्ताईनगरमधील कोथळी येथील संत मुक्ताई यात्रेत हा संतापजनक प्रकार घडला. खुद्द रक्षा खडसे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर सातजणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाने महाराष्ट्रात मंत्र्यांच्या लाडक्या लेकीही सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसह सुरक्षा रक्षकांसोबत यात्रेत गेली होती. यावेळी मिंधे गटाचे कार्यकर्ते असलेले चार टवाळखोर तरुण त्यांचे व्हिडिओ चित्रण करताना दिसले. सुरक्षारक्षकांनी या तरुणांचा मोबाईल घेऊन पडताळणी केली. याचा राग आल्याने चारही टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकांसोबत झटापट केली.
हा प्रकार समजताच रविवारी रक्षा खडसे यांनी महिला आणि मुलींना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात धडक देत आक्रमक पवित्रा घेतला. टवाळखोरांना अटक करा, अशी मागणी करत त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. इतक्या सुरक्षेतही जर राज्यकर्त्यांच्या मुलींची छेड काढली जाते तर सर्वसामान्य मुलींचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
रक्षकांना धक्काबुक्की, मुलींची छेडछाड
मी गुजरातला असताना शुक्रवारी रात्री मुलीने यात्रेत जाण्यासाठी फोन केला. मी तिला सुरक्षा रक्षक आणि ऑफिसमधील स्टाफला सोबत घेऊन जाण्यास सांगितले. यावेळी तिच्या मैत्रिणीही सोबत होत्या. तिथे गेल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी असलेल्या टवाळखोरांनी त्यांचा पाठलाग केला. मुली बसल्या त्या पाळण्यात मुलींच्या शेजारी जाऊन बसले. सुरक्षा रक्षकांनी मुलींना दुसऱ्या पाळण्यात बसवले. परंतु टवाळखोर तेथेही जाऊन बसले आणि मुलींचे व्हिडिओ काढले. सुरक्षा रक्षकांनी त्यांचा मोबाईल घेतला. काय व्हिडिओ काढले हे बघितले असता, टवाळखोरांनी कुणाला तरी व्हिडिओकॉलवर हे व्हिडिओ शेअर केल्याचे लक्षात आले. यावेळी टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकांसोबतही धक्काबुक्की केली. मुलींसोबत छेडछाड देखील केली, असे त्या म्हणाल्या.
सात जणांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अनिकेत भोई, पीयूष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई व सचिन पालवे, यांच्याविरोधात पोक्सो तसेच कलम 66 (ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याचे राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांनी सांगितले.
पोलिसांचा धाक राहिला नाही – एकनाथ खडसे
छेड काढणारे गुंड आणि टवाळखोर आहेत. मुलींबरोबर पोलीसही होते. मात्र या गुंडांनी पोलिसांनाही मारहाण केली. या गुंडांना आता पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पोलीस असतानाही मुलींची छेड काढण्याची हिंमत या गुंडांची होत असेल तर सगळंच कठीण आहे.
महिला सुरक्षित आहेत का? – सुप्रिया सुळे
ही घटना अतिशय संतापजनक आहे. राज्यातील प्रत्येक मुलगी ही सर्वप्रथम महाराष्ट्राची लेक आहे. तिच्या सन्मानाचे रक्षण करणे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. एक आई म्हणून मी रक्षा खडसे यांना झालेल्या वेदना समजू शकते. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन महिला सुरक्षेसंदर्भात राज्याला आश्वस्त करावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘शक्ती’ कायदा हवाच – अनिल देशमुख
संतोष देशमुख हत्या प्रकरण, बदलापुरातील अत्याचार, पुण्यातील स्वारगेट येथील बलात्कार या प्रकरणांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जाते. या घटनांना पायबंद घालण्यासाठी ‘शक्ती’ कायदा आवश्यकच आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख म्हणाले.
आरोपींचे एकनाथ शिंदेंसोबत फोटो
एफआयआरमध्ये नाव असलेले अनिकेत भोई, पीयूष मोरे यांचे आमदार चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापैकी पीयूष मोरे हा मुक्ताईनगर नगर परिषदेचा माजी नगरसेवक आहे.
याआधीही केला होता पाठलाग
24 तारखेला एकादशीला माझी मुलगी फराळ वाटप करायला गेली होती त्या दिवशीही असाच प्रकार घडला होता. याच टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला होता. या सगळय़ा प्रकाराने माझी मुलगी भेदरली आहे, असे रक्षा खडसे यांनी सांगितले.
एका मंत्र्याच्या, खासदाराच्या मुलीसोबत असा प्रकार घडू शकतो तर बाकीच्या मुलींचे काय? याची कल्पनाही करू शकत नाही. हेच टवाळखोर गावातल्या अनेक मुलींना छेडत फिरत असतात. त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हा केवळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही. सगळय़ाच महिला आणि लेकाRचा प्रश्न आहे. – रक्षा खडसे
कुणालाही सोडणार नाही – मुख्यमंत्री
रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारी एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत. मात्र आरोपी कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी असले तरी त्यांना माफी मिळणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.