नारायण मूर्ती 70 तासांहून अधिक वेळ काम करायचे, सुधा मूर्ती यांच्याकडून पतीच्या विधानाची पाठराखण

लोक जेव्हा उत्कटतेने काहीतरी करू इच्छितात तेव्हा ते वेळेचा विचार करत नाहीत. माझ्या पतीने जवळ पैसे नसतानाही इन्फोसिस सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते आठवड्याचे 70 तास किंवा कदाचित त्याहून अधिक वेळ काम करायचे, असे सांगताना राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांनी पतीच्या विधानाची पाठराखण केली. त्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता.

प्रत्येकालाच 24 तास

नारायण मूर्ती यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये 70 तास काम करण्याबद्दल विधान केले होते. यावरून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. याचा दाखला देत सुधा मूर्ती म्हणाल्या की, माझे पती इन्फोसिसमध्ये कामात व्यग्र असताना मी घर आणि मुलांचे संगोपन करण्याचे ठरवले. तेव्हा एका महाविद्यालयात संगणक विज्ञान शिकवण्यास सुरुवात केली. सुंदर असो वा कुरूप, गरीब असो वा श्रीमंत, देवाने प्रत्येकालाच 24 तास दिले असून त्याचा कसा वापर करायचा हे प्रत्येकावर अवलंबून आहे.