
स्टँडअप कॉमेडियन कुणाला कामरा याने केलेले विडंबन गीत मिंधे गटाला चांगलेच झोंबले आणि त्यांच्या नेते व कार्यकर्त्यांनी संबंधित स्टुडिओची तोडफोड केली. यावरून आता राज्यासह देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आमच्या नेत्याचा अपमान झाला असा थयथयाट करणाऱ्या मिंधे गटाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी दिली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करत जया बच्चन यांनी मिंधे गटाला चपराक दिली. ‘तुमच्या नेत्याचा अपमान झाला म्हणता, मग तुम्ही तुमचा मूळ पक्षसोडून दुसऱ्यांसोबत गेला तो बाळासाहेबांचा अपमान नाही का?’, असा बोचरा सवाल जया बच्चन यांनी केला आहे.
मीडियासोबत बोलताना कुणाल कामराच्या घटनेसंदर्भात विचारताच ‘तुम्ही सगळे मीडिया प्रतिनिधी आहात. तुम्हीच बोललं पाहिजे. अशा प्रकारे जर बोलण्यावर बंदी आली तर तुमचं काय होईल? अशीही तुमची स्थिती अत्यंत खराब आहे. तुमच्यावर अनेक बंधनं आहेत. आता तुम्हालाही सांगतील की असंच बोला आणि तसंच बोला, हे बोलू नका. जया बच्चन यांची मुलाखत घेऊ नका’, असं जया बच्चन म्हणाल्या.
‘बोलण्याचं स्वातंत्र्य आहेच कुठे?’, असा प्रश्न करत ‘मारामारी करा, विरोधकांना मारा, महिलांवर बलात्कार करा, त्यांना लटकवा, त्यांचा जीव घ्या, अशा कृतीचं फक्त स्वातंत्र्य आहे’, अशा शब्दात त्यांनी आपला संतापही व्यक्त केला.
एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते हे त्यांच्या नेत्याचा अपमान झाल्याचा दावा करत असल्याचे मीडिया प्रतिनिधीने म्हणताच ‘सत्तेसाठी तुम्ही तुमचा मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षासोबत गेलात, आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा केला हा अपमान नाही झाला का? हा बाळासाहेबांचा अपमान नाही का?’, असा झणझणीत सवाल जया बच्चन यांनी केला. व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.