‘पुष्पा’ या सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग आज राज्यसभेत ऐकायला मिळाला. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनीच हा डायलॉग फेकत विरोधकांना बजावले. आज जगदीप धनखड आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात खडाजंगी झाली. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मरेन, परंतु देशासाठी कुठल्याही परिस्थितीत झुकणार नाही, असे धनखड म्हणाले. मी मजुराचा मुलगा आहे. तुम्ही माझा आदर करणार नसाल, तर मी तुमचा आदर का करू? असा उलट प्रश्न खरगे यांनी केला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
नेमके काय घडले?
विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर धनखड खरगे यांच्यावर संतापले. ते म्हणाले, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. यावर खरगे म्हणाले, मी मजुराचा मुलगा आहे. धनखड म्हणाले, देशासाठी मरेन, परंतु अजिबात झुकणार नाही. खरगे म्हणाले, मी मजुराचा मुलगा आहे. यावर धनखड म्हणाले, मी सर्वांचा आदर करतो, पण तुम्हा लोकांची भाषा बघा. खरगे म्हणाले, आम्ही तुमची स्तुती करण्यासाठी इथे आलेलो नाही. हे ऐकताच धनखड संतापले आणि म्हणाले, देशाला माहीत आहे तुम्हाला कुणाची स्तुती हवी आहे. तुमचा आदर राखण्यात मी कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही. यावर खरगेही संतापले आणि तुम्हीच माझा आदर राखत नाहीत, तर मी तुमचा आदर कशासाठी करू? असा सवाल केला. यावर धनखड म्हणाले, खरगेजी तुमचा आदर करतो, परंतु कुठल्याही स्थितीत मी कमजोर पडणार नाही. सर्वांचे ऐकणार.