शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा; 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती आणि प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा केली. 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये या आघाडीचा पहिला मेळावा होणार आहे.

या तीनही नेत्यांची आज पुण्यामध्ये बैठक झाली. त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या आघाडीला परिवर्तन महाशक्ती नाव देण्याचा निर्णय झाला. 26 सप्टेंबरपर्यंत ज्यांना यात यायचे आहे, त्यांनी यावे असे आवाहन शेट्टी यांनी केले.

संभाजीराजे म्हणाले, जनता अस्वस्थ आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडू शकते. मनोज जरागे पाटील यांनी पण एकत्रित यावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याची भेट झाली आहे. राजकीय चर्चा झाली आहे. आम्ही एकत्रित आलो, तर आम्ही सगळे उमेदवार निवडून आणू शकतो,’ असा विश्वास संभाजीराजे यांनी व्यक्त केला.

बच्चू कडू म्हणाले, ‘मी महायुती बाहेर पडलो आहे हे स्टॅम्पपेपरवर लिहून देऊ का? आता इथे आलो आहे तर महायुती सोडली असे स्पष्ट केले.’ प्रकाश आंबेडकर याच्यासोबत चर्चा झाली आहे ते पण सोबत येतील. ज्योती मेटे याच्यासोबत बोलणं झालेलं आहे. त्यादेखील सकारात्मक आहेत, असे या नेत्यांनी सांगितले.