
कल्याण-तळोजा मेट्रो ही स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी नसून बिल्डरांच्या फायद्यासाठीच सुरू केली असल्याची टीका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. मेट्रोच्या या कामामुळे रोज हजारो नागरिक आणि विद्यार्थी वाहतूककोंडीचा सामना करत असून, यामुळे होत असलेल्या त्रासाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
बोला’नाथ’ किती वर्ष आश्वासन देतो, विकासाचे रोज रोज तेच भाषण देतो, अशा शब्दात त्यांनी शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. राजू पाटील यांची एक्सवरील पोस्ट जोरदार व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कल्याण-तळोजा मेट्रो ही ना येथील नागरिकांच्या फायद्यासाठी आहे, ना विद्यार्थ्यांच्या! ही मेट्रो फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठी आणि प्रकल्पातून मिळणाऱ्या टक्केवारीसाठी आणली आहे. कल्याण-शिळ रस्त्याच्या तिसऱ्या मार्गिकचे अद्याप भूसंपादन झाले नाही, ठेकेदारांना पैसे नाहीत म्हणून पलावा पूल रखडला आहे, पण लोकसभेच्या तोंडावर खोटा विकास दाखवण्यासाठी मेट्रोचे काम सुरू करण्यात आले, असा राजू पाटील यांनी आरोप केला आहे.