वेंगसरकर यांचे क्रिकेटमधील योगदान अतुलनीय – राजू कुलकर्णी

दिलीप वेंगसरकर यांचे क्रिकेटमधील योगदान अतुलनीय आहे, असे हिंदुस्थानचे माजी वेगवान गोलंदाज राजू कुलकर्णी यांनी ड्रीम इलेव्हन कप या 19 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना सांगितले.

हिंदुस्थानात असा एकही कसोटीपटू नाही ज्याने 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत आणि गेली 30 वर्षे अव्याहतपणे तळागाळातील मुलांसाठी मेहनत घेत आहेत. या मुलांना सर्वोच्च दर्जाचे क्रिकेट खेळण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी मिळवून दिला आहे. वेंगसरकर मुंबईच्या निवड समितीचे अध्यक्ष असताना एकदा त्यांनी रोहित शर्माला एका स्पर्धेत खेळताना पाहिले आणि आमच्या समितीला त्याला संघात घेण्याचा आग्रह धरला आणि तोच रोहित शर्मा आज हिंदुस्थानचा कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी करताना दिसतो आहे. त्यामुळे युवा खेळाडूंनी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करीत राहावे. निवड समितीचे तुमच्यावर लक्ष असते, असे सांगितले. ओव्हल मैदानावर झालेल्या या स्पर्धेत राजेश सुनील संचालित साई सिया क्रिकेट अकादमी संघाने ड्रीम 11 वेंगसरकर क्रिकेट अकादमीवर पाच विकेटनी मात करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.