कोरोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातले होते. यानंतर तब्बल चार वर्षांनी HMPV व्हायरसने डोके वर काढले. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आता जम्मू-काश्मीरमध्ये एका नव्या आजाराने धुमाकूळ घातलाय. हा आजार इतका भयंकर आहे की, त्यामुळे एकाच गावातील 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या केंद्र सरकारचे एक विशेष वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले असून ते या गूढ आजाराबाबत माहिती घेत आहेत.
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमधील गावात एका रहस्यमय आजाराने शिरकाव केला आहे. यामुळे गावात तीन कुटुंबातील 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्युपूर्वी रुग्णांना ताप येणे, शारीरिक वेदना होणे, मळमळ होणे, जास्त घाम येणे आणि चक्कर येणे यांसारखी काही लक्षणे दिसून आली. यानंतर रुग्णांना रुग्णालायत दाखल केले असता काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्यील गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, केंद्र सरकारतर्फे एक विशेष वैद्यकिय पथक गावात पाठवण्यात आले. वैद्यकीय पथकांनी तपासणीसाठी नमुने घेतले आहेत. दरम्यान, तपासणी आणि नमुन्यांमधून हे स्पष्ट झाले आहे की, या घटना जिवाणू किंवा विषाणूजन्य उत्पत्तीच्या कोणत्याही संसर्गजन्य रोगामुळे घडलेल्या नाहीत. मात्र, तरीही गावकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
गावांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण
जम्मू-कश्मीरमधल्या गावातील मोहम्मद अस्लम या व्यक्तीने आपल्या कुटुंबातील आठ सदस्य गमावले. ज्यात त्याच्या सहा मुलांचाही समावेश आहे. रविवारी संध्याकाळी त्यांच्या आणखी एका मुलीचाही या आजाराने मृत्यू झाला. या आजारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.