
बाॅलीवूडमध्ये जीवनपटावर आधारित चित्रपट बनणे हे आता नवीन राहिले नाही. येत्या काही काळात हिंदुस्थानचा माजी खेळाडू आणि कर्णधार सौरव गांगुली यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार आहे. स्वतः सौरव गांगुली यांनी ही माहिती नुकतीच माध्यमांना दिली आहे.
सौरव गांगुलीची भूमिका राजकुमार राव साकारणार असून या बातमीने राजकुमार रावचे फॅन्स चांगलेच खुश झाले आहेत. सध्याच्या घडीला राजकुमार राव एका दुसऱ्या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्यामुळे, हा चित्रपट होण्यासाठी किमान एक वर्षापेक्षा कालावधी जाणार आहे. सौरव गांगुलीची ओळख ही क्रिकेटरसिकांना नवीन नाही. परंतु आता त्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर पाहताना क्रिकेट रसिकांसोबत इतर प्रेक्षकांनाही सौरव गांगुलीचा जीवनपट पाहण्याची संधी मिळणार आहे. सौरव गांगुलीची ओळख क्रिकेटचा महाराजा अशी आहे. या महाराजाची भूमिका आता मोठ्या पडद्यावर वठविण्यासाठी राजकुमार राव सज्ज झाला आहे.
क्रिकेटवरील आधारित सिनेमांना प्रेक्षकांकडून पसंती मिळत असल्याने, बाॅलीवूडने कायमच क्रिकेटर्सवर सिनेमे बनवले आहेत. कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि आता सौरव गांगुलीचा नंबर लागला आहे. क्रिकेटच्या मैदानातील हा दादा रुपेरी पडद्यावर कितपत दादागिरी हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
राजकुमार राव हा एका वेगळ्या धाटणीचा कलाकार असून, येत्या काही दिवसात त्याची ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बरेली की बर्फी, स्त्री, दंगल, डाॅली की डोली, क्वीन, रागीनी एमएमएस, शैतान, लव्ह सेक्स और धोखा यासारख्या चित्रपटांमधून राजकुमार राव हा झळकला होता. शाहिद या चित्रपटासाठी राजकुमार राव याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळेच विविधांगी भूमिका साकारलेल्या राजकुमार रावची सौरव गांगुलीची भूमिका प्रेक्षकांना किती पसंतीस पडेल हे येणारा काळच ठरवेल.