अमेरिकेत ईव्हीएम हॅक होऊ शकते हिंदुस्थानात नाही, ईव्हीएम घोटाळ्यावर निवडणूक आयोगाचे तेच तुणतुणे

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमशी झालेली छेडछाड तसेच मतमोजणीतील तफावतीबद्दल अनेक पुरावे देऊनही ईव्हीएम घोटाळय़ावर निवडणूक आयोगाने आज पुन्हा तेच तुणतुणे वाजवले. ईव्हीएम अमेरिकेत हॅक होऊ शकते… हिंदुस्थानात नाही, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. मात्र अमेरिकेत बॅलेट पेपवरही निवडणूक झाली याचा उल्लेख करणे त्यांनी सोयिस्करपणे टाळले. राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यावेळी पत्रकारांनी ईव्हीएम घोटाळय़ाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला राजीव कुमार यांनी उत्तरे दिली.

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकते असे सांगत ईव्हीएमच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. याचा संदर्भ देत ईव्हीएम हॅक होऊ शकते का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुख्य निवडणूक आयुक्तांनी ईव्हीएम हॅक होऊ शकते, ही शक्यताच फेटाळून लावली.