
घाटकोपर पूर्वेकडील महानगर पालिकेच्या सेठ वी.सी. गांधी आणि एम.ए. ओरा राजावाडी हॉस्पिटल यांच्या सुरू केलेल्या सिटी स्पॅन आणि एमआरआय सर्व्हिस सेंटरचा नामफलक शिवसेनेच्या दणक्यामुळे मराठीत झळकला आहे.
राजावाडी रुग्णालयात सुरू केलेल्या सर्व्हिस सेंटरचे काम मॅक्सिस हेल्थ केअर इमॅजीन या संस्थेला देण्यात आले आहे. यासंदर्भातील मोठा नामफलक इंग्रजी अक्षरात लावण्यात आला होता. विशेष म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही पालिकेच्या रुग्णालयात मराठीला दुय्यम स्थान दिले गेल्याने शिवसेना विभाग प्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग प्रमुख चंद्रपाल चंदेलिया, शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्वय प्रकाश वाणी, महाराष्ट्र राज्य शिक्षक आणि शिक्षकेतर सेनेचे सचिव सचिन भांगे व चंद्रकांत हळदणकर यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत नामफलक मराठीत लावण्याच्या सूचना केल्या.
शिवसैनिकांच्या दणक्यानंतर इम मॅक्सीस हेल्थकेअर इमॅजीन इंडिया संस्थेचे मॅनेजर शैलेश त्रिवेणी यांनी याबाबत क्षमा मागितली असून या फलकाला बदलून मराठी फलक त्वरित लावण्यात आला.
एकीकडे मराठी भाषेला सर्वत्र सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी आंदोलन मोर्चे होत असताना घाटकोपरमध्ये अशा प्रकारची फलकबाजी पाहून शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.