
ट्रायल शो दरम्यान हॉट एअर बलूनची दोरी तुटल्याने उंचावरून खाली पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची जयपूरमध्ये घडली. गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वासुदेव खत्री (40) असे मयत कामगाराचे नाव आहे. घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचे डीएसपी ओमेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले.
राजस्थानमधील बारां जिल्ह्याच्या स्थापनादिनानिमित्त गुरुवारी सकाळी हॉट एअर बलून शो चे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा संकुलात हा शो संपन्न होणार होता. या शो साठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह शाळकरी मुलंही उपस्थित होती.
हॉट एअर बलूनच्या दोन फेऱ्या झाल्या होत्या. यापैकी एका फेरीत स्थानिक आमदारांनी उड्डाण केले होते. तिसऱ्या फेरीत शाळकरी मुलं जाणार होती. तिसऱ्या फेरीआधी हॉट एअर बलून सर्व्हिस प्रोव्हायडर फर्मचा मृत कर्मचारी ट्रायल घेत होता.
ट्रायलदरम्यान बलून अचानक आकाशात जाऊ लागला. यावेळी बलूनची दोरी खत्री यांच्या हातात होती. यामुळे बलूनसह खत्रीही वर ओढले गेले. सुमारे 100 फूट वर जाताच बलूनची दोरी तुटली आणि खत्री खाली कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी हॉट एअर बलून कंपनीचे संचालक विक्रांत सागर यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.