
महिला अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी गुन्हेगारांना जरब बसेल, अशी शिक्षा झाली पाहिजे. महिलांची छेडछाड करणाऱ्यांना बेदम चोप दिला पाहिजे आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करून सोडून दिले पाहिजे, तरच असे गुन्हे कमी होतील, असे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी म्हटले आहे.
भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. एखाद्या महिलेशी गैरवर्तन होत असताना लोक त्याचा व्हिडिओ बनवतात हे योग्य नाही. एखाद्या महिलेचा विनयभंग होत असेल तर त्या पुरुषाला पकडा. तो माणूस आहे आणि तुम्हीही माणूस आहात. जर तुम्ही हिंमत केली तर तुमच्यासोबत आणखी 2 ते 4 लोक येतील. घटनास्थळी जाऊन संबंधिताला चोप द्यायचा, ही मानसिकता आपल्या मनात आल्याशिवाय हे गुन्हे थांबणार नाहीत, असे बागडे म्हणाले.
शिवरायांच्या शिक्षेचा दाखला
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते, तेव्हा पाटील गावाचा प्रमुख असायचा. एका पाटलाने एका तरुणीवर अत्याचार केला. ते दुष्कृत्य समोर येताच शिवाजी महाराजांनी अत्याचार करणाऱ्याला जीवे मारू नका, त्याचे त्याचे हातपाय तोडून त्याला सोडून द्या, असे सांगितले. तो मरेपर्यंत तशाच अवस्थेत राहिला, असा शिक्षेचा दाखला हरिभाऊ बागडे यांनी दिला.
कायद्याचा धाक कसा राहील याचा विचार करा
गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटते की नाही हेच कळत नाही. सध्या आपल्या देशात १२ वर्षांखालील मुलीवर लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग केला तर फाशीची तरतूद आहे, पण तरीही अशा घटना थांबत नाहीत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कायद्याचा धाक कसा राहील याचा विचार करण्याची गरज असल्याचे बागडे म्हणाले.