‘दादी’वरुन राजकारण तापलं, राजस्थानच्या विधानसभेत मध्यरात्री काँग्रेस आमदारांचा ठिय्या अन् किर्तन; नेमकं प्रकरण काय?

राजस्थानमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विधानसभेमध्ये शुक्रवारी भाजपचे मंत्री अविनाश गेहलोत यांनी हिंदुस्थानच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत एक विधान केले. यामुळे विधानसभेमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. काँग्रेसच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या 6 खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आणि कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले. विधानसभा अध्यक्षांच्या या कारवाईनंतर काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेतच ठिय्या आंदोलन सुरू केले. एवढेच नाही तर काँग्रेस आमदारांनी अख्खी रात्र विधानसभेत काढली.

अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान प्रश्नोत्तराचा तास सुरू होता. यावेळी मंत्री अविनाश गेहलोत यांनी विरोधकांकडे इशारा करत म्हटले की, 2023-24 मध्येही तुम्ही नेहमीप्रमाणे महिलांसाठीच्या योजनेला तुमची ‘दादी’ इंदिरा गांधी यांचे नाव दिले होते. या विधानानंतर काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले आणि ‘दादी’ हा शब्द रेकॉर्डवरून हटवण्याची मागणी केली. यानंतर काँग्रेसच्या काही आमदारांनी घोषणाबाजी सुरू करत वेलमध्ये उडी घेतली. यावर संसदीय कार्यमंत्री जोगाराम पटेल यांनी ‘दादी’ या शब्दात काहीही असंसदीय नसल्याचे म्हटल्याने काँग्रेसच्या आमदारांनी आणखी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने विधानसभा अध्यक्षांचाही पारा चढला. त्यांनी गोविंद सिंह डोटासरा, रामकेश मिना, अमीन कागजी, झाकिर हुसैन, हाकिम अली आणि संजय कुमार या सहा खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले. यानंतर या सहा निलंबित आमदारांसह काँग्रेसच्या इतर आमदारांनी विधानसभेतच ठिय्या आंदोलन सुरू केले. एवढेच नाही तर रात्रीच्या वेळी गादी, उशी आणून तिथेच झोपही काढली. यावेळी काँग्रेस आमदारांनी किर्तनही केले. शनिवारीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभरात आंदोलन केले. तसेच अविनाश गेहलोत यांचा पुतळाही जाळला.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते टीकाराम जूली यांनी भाजपचा कारभार हुकुमशाही पद्धतीने सुरू असल्याचा आरोप केला. अविनाश गेहलोत यांनी केलेली टीप्पणी असंसदीय असून भाजप विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.