राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या ताफ्याला अपघात झाला आहे. बुधवारी दुपारी झालेल्या या अपघातात सुरक्षारक्षकांसह नऊ जण जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. या अपघातानंतर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला धडक देणाऱ्या कारवर जप्तीची कारवाई करत पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री भजनलाल यांनी आपल्या ताफ्यासाठी सामान्य जनतेची गैरसोय होऊ नये असे आदेश दिले होते. त्यामुळे वाहतुकीत कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. याचवेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना जयपुर मध्ये रॉंग साईडने आलेली एक कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली आणि सुरक्षारक्षकांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांसह नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोन सुरक्षारक्षकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अति दक्षता विभागात हलवण्यात आले आहे. जखमींना स्वतः मुख्यमंत्री रुग्णालयात घेऊन गेले आणि त्यांना तिथे दाखल केले. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.