राजस्थानचे मुख्यमंत्रीच म्हणाले, नरेंद्र मोदी अ‍ॅक्टर आहेत!

भाजपचे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी नरेंद्र मोदी हे आपले सर्वात आवडते अ‍ॅक्टर असल्याचे म्हटले आहे. शर्मा यांनी यासंदर्भात केलेले वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

जयपूरमध्ये रविवारी एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना पत्रकारांनी त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचे नाव विचारले, त्यावर भजनलाल शर्मा यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव घेतले. त्यांचे हे विधान राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी सोशल मीडियावर व्हायरल करत मुख्यमंत्रीच पंतप्रधानांना नेता नाही तर अभिनेता मानतात, अशी उपरोधिक टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे नेते नसून अभिनेते आहेत, असे आपण खूप दिवसांपासून म्हणत आलो आहोत. अलीकडे भाजप सरकारचे मुख्यमंत्रीही मोदीजी हे लोकनेते नसून अभिनेते आहेत, असे म्हणू लागले आहेत असेही ते म्हणाले.