ठाणे बदलतेय.. अशी टिमकी वाजवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या घराजवळच वाहतुकीची घडी पुरती विस्कटली आहे. पूर्वी स्वच्छ आणि सुंदर असे नावाजले जाणारे ठाणे आता वाहतूककोंडीचे ठाणे बनले आहे. ही कोंडी कमी करण्याऐवजी प्रशासनातील अधिकारी महसूल गोळा करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या वाहतूककोंडीत दोन दिवसांत सुधारणा करा अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी दिला. गेले काही दिवस सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे ठाणेकर बेहाल झाले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजन विचारे यांनी आज ठाण्याचे पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
गेल्या चार वर्षांपासून घोडबंदर रोडवर सुरू असलेले मेट्रो मार्गाचे काम अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि सर्व्हिस रोडवरील बेकायदा पार्किंग यामुळे ठाणेकरांना ट्रॅफिककोंडीचा मनस्ताप भोगावा लागत आहे. सणासुदीच्या काळात वाहतूककोंडी कमी करण्याऐवजी प्रशासकीय अधिकारी महसूल गोळा करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर रस्त्यावर वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. शहरात दिवसा जड-अवजड वाहने सोडण्यास मनाई असतानाही ही वाहने सर्रास सोडली जातात. नवी मुंबई आणि पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाने जड- अवजड वाहनांना बंदी घातली आहे. मग ठाण्यातील पोलीस आयुक्त काय करीत आहेत, असा नागरिकांचा सवाल आहे, याकडे विचारे यांनी लक्ष वेधले.
सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबाची सुरक्षा कमी करून तेच मनुष्यबळ रस्त्यावर उतरवा
मुख्यमंत्री हे ठाण्यातील असल्याने ते शहरात फिरत असताना येथील अंतर्गत रस्तेही बंद केले जातात. त्यातच ठाण्यातील अंतर्गत रस्त्यांवर डिव्हायडर व रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांमुळे रस्ते छोटे झाल्याने नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. सध्या ठाण्यातील राजकारण्यांच्या नातेवाईकांना, स्वीय सहाय्यकांना तसेच चिल्लर पदाधिकाऱ्यांनादेखील पोलीस सुरक्षा देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिलेली सुरक्षा कमी करून तेच मनुष्यबळ ठाण्याच्या नाक्या-नाक्यावर तैनात करावे, अशी मागणी राजन विचारे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
मागील ४ वर्षांपासून ठाणे शहर घोडबंदर रोडवरील मेट्रो बांधकाम सुरू आहे त्याचबरोबर शहरातील वाढते खड्डे यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. आज पोलिस आयुक्त आशितोष डुंबरे यांची भेट घेतली व वाहतूक कोंडीवर त्वरीत उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा पत्राद्वारे दिला.#traffic #road pic.twitter.com/4xNzRLxMF7
— Rajan Vichare – राजन विचारे (@rajanvichare) September 5, 2024