आनंदाश्रमात नोटा उडवणे तुमची संस्कृती आहे का? मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या! राजन विचारे यांचे मिंध्यांना आव्हान

लाखो शिवसैनिकांचे पवित्र मंदिर असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात नोटा उधळून त्या पायदळी तुडवण्यात आल्या. हा नंगानाच सोशल मीडियावर व्हायरल होताच मिंध्यांच्या बगलबच्चांनी माफी मागण्याचे नाटक सुरू केले आहे, पण या किळसवाण्या कृत्यामुळे ठाणे शहराला काळिमा फासला गेला आहे. तुम्ही माफी कसली मागताय? हिंमत असेल तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा देऊन या पापाचे प्रायश्चित्त घ्यावे, असे थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी दिले आहे.

गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू असताना धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात मिंध्यांच्या पंटरांनी सत्तेचा उन्माद दाखवत ढोलताशे बडवले. एवढेच नव्हे तर आनंद दिघे यांच्या तसबिरीभोवती नोटांची बंडले ओवाळून ती पायदळी तुडवली. प्रसारमाध्यमांमधून याबाबतचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाल्यानंतर मिंध्यांच्या बिळातील काही ‘उंदीर’ त्या संतापजनक कृत्याची पाठराखण करीत आहेत. खोटे बोलण्यात हे ‘उंदीर’ माहीर असून या खोटारडेपणाचा बुरखा सर्वसामान्य ठाणेकर  फाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत राजन विचारे यांनी सुनावले. ते पुढे म्हणाले की, आनंद दिघे हयात असते तर तुमची हिंमत झाली असती काय? त्यांनी तुम्हाला हंटरने बडवले असते.  

सत्तेचा गैरवापर करून विश्वासघात

मिंध्यांनी खोक्याचे राजकारण केलेच, पण सत्तेचाही गैरवापर करून  केवळ ठाणेकरांचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वासघात केला. ज्या आनंदाश्रमामधून गोरगरीबांना न्याय देण्याचे काम अनेक वर्षे करण्यात आले त्यावर तुम्ही स्वतःची पाटी लावली. थोडी तरी लाज, शरम आहे काय? असा संतप्त सवाल शिवसेना नेते राजन विचारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

गद्दारांना धडा शिकवा!

एक आदर्श वस्तुपाठ म्हणून धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमाकडे एकेकाळी बघितले जायचे. त्याचे अनुकरण संपूर्ण राज्यात होत असे, पण मिंध्यांनी त्या वास्तूतील पावित्र्य नष्ट केले आहे असा थेट आरोप आनंद दिघे यांचा पत्रव्यवहार सांभाळणारे कट्टर शिवसैनिक नंदकुमार गोरुले यांनी केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, एका उद्योजकाने दिघे यांना सोन्याचे पेन भेट म्हणून दिले होते, पण त्यांना स्वतःला कसलाही मोह नव्हता. ते पेन त्यांनी एका विद्यार्थ्याला तत्काळ दिले. असा कोणताही मोह आयुष्यभर न बाळगलेल्या धर्मवीरांच्या तसबिरीभोवती तुम्ही नोटा ओवाळता? मुख्यमंत्री, तुम्हाला लाज वाटली पाहिजे असे सांगत गोरुले यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आनंदाश्रमाचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रकार शिवसैनिक कदापि खपवून घेणार नाही.  ठाणेकरांनो पुढे या आणि या गद्दारांना धडा शिकवा असेही त्यांनी स्पष्ट केले.