मी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक, नाराज असल्याच्या अफवा! – राजन साळवी

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे. हा निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेबांचाच राहणार. मी नाराज असल्याच्या अफवा आहेत, असे शिवसेना उपनेते राजन साळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राजन साळवी नाराज असून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. यावर राजन साळवी यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, विधानसभा निवडणूक 2024 मध्ये आम्ही पराभवाला सामोरे गेलेलो आहोत. ते दु:ख, ती खंत, त्या वेदना माझ्यासह मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना आणि सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्याचे मार्गक्रमण करतोय.

तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी भाजपच्या, शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसे काहीही नाही. मी माझ्या मतदारसंघात सक्रिय आहेत. नाराज असल्याच्या बातम्या अफवा आहेत. हा निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेबांचाच राहणार, असेही राजन साळवी यांनी सांगितले.