मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनच काम करत राहणार; राजन साळवी यांनी फेटाळल्या पक्षांतराच्या अफवा

शिवसेना उपनेते राजन साळवी हे नाराज असून भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत अशा अफवा आज प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्या होत्या. राजन साळवी यांनी त्या फेटाळून लावल्या असून आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत म्हणूनच काम करत राहणार, असे स्पष्ट केले आहे.

पक्षांतराच्या अफवा पसरल्याचे समजल्यानंतर राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधत त्या फेटाळून लावल्या. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे. मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवर आहे, इतर गटाच्या वाटेवर आहे अशी चर्चा सुरू असल्याचे मला प्रसारमाध्यमांतूनच कळले, परंतु त्या केवळ अफवा असल्याचे राजन साळवी यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या वेदना आहेतच, पण त्यातूनही आम्ही पुढे मार्गक्रमणा करतोय. भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षात मी जाणार नाही. राजन साळवी आमच्या पक्षात आले तर त्यांचे स्वागतच करू अशा प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिल्या होत्या. त्यावर पिकल्या आंब्यावरच दगड मारण्याचा प्रयत्न होतो, असे साळवी म्हणाले. पराभवानंतर पक्षप्रमुखांनी संपर्क साधला का? असे विचारले असता ते म्हणाले की, पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ येथे पराभूत उमेदवारांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या, अशी माहिती साळवी यांनी दिली. एसीबी चौकशीबाबत सांगताना त्यासंदर्भात आपण उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.