भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबईत मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे असे काही नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी केले. या विधानाचा मनसे नेते राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. तसेच भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं, असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याचं ऐकलं. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय? भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…. आणि भैय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता… भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.