रईस शेख यांनी नितेश राणेंच्या तोंडावर मारली शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी, ऐतिहासिक दस्तऐवजांचे पुरावेही दिले

छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही मुस्लिम सरदार ठेवले नव्हते तसेच महाराजांचे युद्ध मुस्लिमांच्या विरोधात होते, असे वादग्रस्त वक्तव्य मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी येथील सभेत केले होते. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवरायांच्या दहा मुस्लिम सरदारांची यादीच त्यांनी नितेश राणे यांच्या तोंडावर मारली आहे. बरोबर ऐतिहासिक दस्तऐवजांचे पुरावेही दिले आहेत.

रईस शेख यांनी मंत्री राणे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दहा मुस्लिम सरदारांची नावे दिली आहेत. त्यामध्ये पन्हाळगड वेढ्यात साथ दिलेला सिद्दी हिलाल व त्याचा पुत्र सिद्दी वाहवाह, घोडदळ प्रमुख नूरखान बेग, सरदार शमाखान, आरमारप्रमुख इब्राहिम खान, अंगरक्षक सिद्दी इब्राहिम, आरमाराचा अधिकारी दौलतखान, विश्वासू सेवक मदारी मेहतर तसेच वकील काझी हैदर या दहा मुस्लिम सरदारांची नावे आहेत.

संत तुकाराम व संत रामदास यांच्याप्रमाणे रत्नागिरीचे मुस्लिम संत बाबा याकुत यांचाही शिवाजी महाराज आदर करायचे. शिवाजी महाराजांचे राज्य धर्मयुद्ध नव्हते. पीर, दर्गा, मशिद यांची इनामे महाराजांनी कायम चालू ठेवली. याचे संदर्भही शेख यांनी पत्रात जागोजागी दिले आहेत.