तामिळनाडूच्या अनेक शहरांमध्ये पावसाचा कहर, पुडुचेरी-विल्लुपुरमसह कुड्डालोरमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद

फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस सुरू आहे. या चक्रीवादळामुळे पुद्दुचेरी, विल्लुपुरम आणि कुड्डालोर भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या काळात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी जारी केले आहेत.

याचबद्दल बोलताना पुद्दुचेरीचे शिक्षणमंत्री ए. नामचिवायम म्हणाले की, फेंगल चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळेच मंगळवार, 3 डिसेंबर रोजी सर्व सरकारी आणि खासगी शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, पुडुचेरी सरकारने फेंगल चक्रीवादळामुळे बाधित नागरिकांना मदत देण्याची घोषणाही केली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सोमवारी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांनी माहिती दिली की, फेंगल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीमध्ये 48 टक्के पाऊस पडला, जो अनपेक्षित होता. पुद्दुचेरी सरकारने चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांना 5,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. रंगास्वामी पुढे म्हणाले की, याशिवाय पुद्दुचेरी राज्यात अतिवृष्टीमुळे 10,000 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.