कोकणातही फेंगल चक्रीवादळाचा परिणाम, पुढील दोन-तीन दिवस पावसाचा इशारा

तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळाने हाहाःकार माजवला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे कोकणातील हवामानातही बदल झाला आहे. रत्नागिरीत आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. चक्रीवादळाचा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने सरकत असून पुढील 2-3 दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. यामुळे कोकणात काही ठिकाणी हलका ते मध्यम पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर मध्य महाराष्ट्रातही तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.

फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार वारा आणि मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. या वादळादरम्यान ताशी 90 किमी वेगाने वारे वाहत असून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

पुद्दुचेरीत पावसाने 30 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

फेंगल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीत 24 तासात 48.4 सेमी पावसाची नोंद करण्यात आली. पुद्दुचेरीमध्ये पावसाने गेल्या 30 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.