मान्सून अगोदरची तयारीच नाही, पहिल्याच पावसानं बींग फोडलं- सचिन अहिर

रात्रभर पडणाऱ्या धुवाधार पावसाने मुंबईला झोडपले असून मुंबईतील रस्ते जलमय झाले आहेत. वाहतूक विस्कळीत झाली आहे, लोकल ट्रेनला देखील या पावसाचा मोठा फटका बसलाय. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प होती. त्यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते, आमदार सचिन अहिर यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर टीका केली आहे.

सचिन अहिर म्हणाले की, महानगर पालिकेच्या कामकाजामध्ये साफसफाई जी व्हायला हवी होती ती झालेली नाही. मान्सूनच्या अगोदरही नाही नंतरही नाही आणि त्यानंतर होईल की नाही होईल हेही माहित नाही. त्याचा परिणाम या मोठ्या पावसाने दाखवलेला आहे. ट्रेन बंद झालेल्या होत्या. काही आमदारांना रेल्वेतून उतरुन चालत जावे लागले आहे. ही परिस्थिती दुर्देवी आहे. पण हेच जर आमच्याकडे नगरपालिका असती तर लगेच आरोप केले असते. पण आज त्यांच्याकडे महानगरपालिकेचा ताबा आहे, नगरविकास खाते आहे. दोन दोन उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा केल्यानंतरही प्रशासन जागे होत नाही. त्यातून अशा ज्या घटना घडणं हे दुर्देवी आहे आणि याचा जाब आम्ही निश्चितपणे विचारल्याशिवाय राहणार नाही.

ते पुढे म्हणाले की, पाण्याचा जो निचरा व्हायला हवा ते देखिल कुठेतरी होताना पाहायला मिळत नाही आणि जे वॉटर लॉग्स आहेत त्यावेळी असा पाऊस आला की सतर्क राहतो. यातून आपण सक्षन टँकर घेऊन पाणी काढून टँकरमधून ते काढण्याचा प्रयत्न करतो. हेही यावेळी सक्रियपणे दिसलेले नाही. आपण पाहिले असेल की ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो, ज्यावेळी महानगरपालिका आमच्याकडे होती. त्यावेळी जे मेजर वॉटरलॉग्स आहेत यामध्ये उपाययोजना करून, नवीन पाईपलाईन करून लाखो रुपयाचा निधी देऊन काम केलेले आहे. जयहिंद, भारतमाता, नामजोशी, सायन मार्केट या ठिकाणी आम्ही तातडीने लक्ष देऊन काम केलेली आहेत. वॉटरलॉग्स आहेत ते नवीन ठिकणी कुठे होणार आहेत, हे पाहणं प्रशासनाची जबाबदारी आहे, प्रशासन महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपये आपल्या काही जवळच्या लोकांना ठेकेदारांना मदत करण्यासाठी करत आहेत. ही जबाबदारी महानगरपालिका आणि प्रशासनाची नाही आहे का? 10 हजार फिक्स डिपझिटमध्ये घेऊन आज इन्फ्रास्ट्रक्टरसाठी खर्च होत असेल त्यातून एका पावसात अशी परिस्थिती निर्माण होत असेल  26 जुलैचा पाऊस अजून लोकं विसरलेली नाहीत. अशी परिस्थिती आली तर अर्धी मुंबई त्याहून लोकांच्या हालअपेष्टा होतील का हे एका पावसाने दाखवून दिलेले आहे. म्हणून प्रशासनाला आमचे स्पष्ट म्हणणे राहणार आहे की अशी ढिसाळ कामे आणि जे ठेकेदारांना मदत करण्याचे काम करत आहेत अशा अधिकारी आणि ठेकेदारांवर तातडीने कारवाई व्हायला हवी अशी आमची अपेक्षा आहे.