गेल्या आठवडय़ात मुंबईसह उपनगरात तसेच महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने ओढ दिली. गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हीटचे चटके जाणवू लागले. याचदरम्यान आज मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिह्यात काही भागात वादळी वाऱयासह पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला. सायंकाळनंतर नवरात्रोत्सवात पावसानेही गरबा केला. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिह्यात मुसळधार पाऊस पडल्याने गरबाप्रेमींच्या उत्साहावर विरजण पडले.
दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळनंतर अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रविवारी सुट्टीचा दिवस असला तरीही नवरात्रोत्सवानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची एकच धावपळ उडाली.
– आज दुपारी कुलाबा येथे 33 तर सांताक्रुझ येथे 35 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दिवसभर कडक उन्हाचे चटके बसत होते. मात्र संध्याकाळी हवामानात बदल झाला. सोसाटय़ाच्या वाऱयासह मुंबईत पाऊस कोसळला.