मागील दोन दिवसांपासून उष्म्यात वाढ झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी सांगलीसह जिह्याच्या पश्चिम भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. काही गावांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
सांगली जिह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या कामांना गती आली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून उष्मा वाढला होता. ढगाळ वातावरणही राहिले. मात्र, पावसाने हुलकावणी दिली होती. सोमवारी सायंकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्यांतील अनेक गावांना जोरदार पावसाने झोडपून काढले. जून महिन्यापासून सातत्याने पाऊस होत असल्याने शेतात पाणी कायम आहे. त्यातच पुन्हा पाऊस झाल्याने शेतीच्या नियमित कामांवर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे.
सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी शाळा आणि शासकीय कार्यालये सुटल्यानंतर काही वेळातच पाऊस सुरू झाला. पावसामुळे भाजीविक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. सुमारे तासभर पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते. राम मंदिर, काँग्रेस भवन, स्टेशन चौक, एस. टी. स्टँड परिसर, मारुती चौकात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पावसाचा मुक्काम असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.