पुण्यातील शिवाजीनगर, घोरपडी, औंध परिसरात आज पावसाने हजेरी लावली. ऐन थंडीच्या दिवसात सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची पुरती तारांबळ उडाली. दरम्यान, पुढील दोन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच ३१ डिसेंबरनंतर नववर्षाच्या सुरुवातीला थंडीचे पुन्हा पुनरागमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हिवाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या थंडीच्या पहिल्या लाटेने पुण्यासह महाराष्ट्रातील नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली होती. पहाटे कडाक्याची थंडी, दुपारी गार वारा आणि संध्याकाळी पुन्हा गारठा असे वातावरण नागरिकांना अनुभवायला मिळाले. मात्र, मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडी गायब झाली आणि आज सायंकाळच्या दरम्यान पुण्यातील शिवाजीनगर, घोरपडी, औंध परिसरात हलक्या स्वरूपातील पावसाच्या सरी कोसळल्या. पुढील दोन दिवस शहर व शहर परिसरात संध्याकाळी ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच १ जानेवारीपासून आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे, तर सकाळी धुके पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने राज्यातील नागपूर, अकोला, अमरावती, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर हलक्या सरी कोसळण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे