नागपूर बुडाले, पालिकेची पोलखोल; घरांत पाणी घुसले, रस्ते बंद, विमानतळ ठप्प, जनजीवन विस्कळीत

मुंबईत काही मिनिटांसाठी पाणी तुंबल्यावर अक्षरशः बोंब मारणाऱ्या भाजपचे पितळ आज नागपूरमध्ये उघडे पडले. संपूर्ण नागपूर शहरात पाणी तुंबल्याने लोकांच्या घरात पाणी घुसले. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. विमानतळ परिसरही पाण्याखाली गेल्याने प्रवाशांची ये-जा पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केली. महानगरपालिका परिसरात जागोजागी पाणी तुंबल्याने शाळा आणि अनेक कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. नागपूर बुडाल्याने पालिकेच्या ‘काम केल्या’च्या दाव्यांची मात्र पोलखोल झाली असून ‘मुंबईवर बोलणाऱ्या’ भाजप नेत्यांची तोंडे मात्र बंद झाली.

नागपूर शहरात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात जागोजागी खोदकाम व सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक चौकात तलावाचे स्वरूप आले आहे. अनेक वस्त्यांमध्ये सिमेंटचे रस्ते उंच झाल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. नागपूर शहरासह आणि जिह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी नागरिक संवाद साधून तक्रारी मांडत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने सुट्टीचा आदेश उशिरा काढल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत पोहोचले होते. त्यामुळे मुलांना घरी नेण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागली.

शेकडो गावांचा संपर्क तुटला

नागपूर ग्रामीणमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहायला लागल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प पडली. भिवापूर तालुक्यातील मांगली जगताप या सुमारे 500 लोकवस्तीच्या गावाकडे जाणारे सर्व रस्ते जलमय झाल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. नागपुरातील बेसासारख्या भागात तलावासारखी स्थिती निर्माण झाली.

वस्त्यांचा वीज पुरवठा बंद

विजांच्या कडकडाटासह वादळी व मुसळधार पावसामुळे शहरातील शेकडो वस्त्यांचा वीज पुरवठा बंद पडला. अनेक भागात विजेच्या तारांवर झाडे उन्मळून पडल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.

शेती पाण्याखाली, शेतकरी संकटात

नागपूर जिह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी शेतीत घुसल्याने शेती पाण्याखाली गेली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक, कपाशी, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले. संततधारेमुळे धानाचे रोवणेही खोळंबले.

नाल्यांवरील पूल पाण्याखाली

शहरातील नाल्यावरील सर्व पुलांवरून पाणी वाहत होते, तर सब वेमध्ये पाणी भरले होते. शहरालगतच्या बहुतेक वस्त्या पाण्यात बुडाल्या. यामुळे पालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरला.