
पुराच्या उंबरठय़ावरून मागे फिरलेला पाऊस पाच-सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कालपासून सक्रिय झाला आहे. आज सकाळपासून तर धुवाँधार, संततधार स्वरूपाचा पाऊस सुरू होता. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत अडीच फुटांची वाढ झाली. सकाळी 18 फूट असलेली पंचगंगेची पाणीपातळी सायंकाळी चारच्या सुमारास 20.5 फूट झाली होती, तर 22 बंधारे पाण्याखाली गेले होते.
कोल्हापूर जिह्यातील 8.36 टीएमसी क्षमतेचे राधानगरी धरण 4.21 टीएमसी भरले असून, धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे धरणाची पातळी वाढत आहे. राधानगरी, वारणा, तुळशी, कुंभी, कासारी, कडवी हे मोठे धरण प्रकल्प 50 टक्क्यांहून अधिक भरले आहेत. सकाळी 7च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1 हजार 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व रुकडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी. वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे व चिखली. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव. दूधगंगा नदीवरील- दत्तवाड. कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली. वारणा नदीवरील- चिंचोली आदी 22हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले होते.
गगनबावडा तालुक्यात 63.4 मि.मी. पाऊस
कोल्हापूर जिह्यात गेल्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 63.4 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हातकणंगले 13.7 मि.मी., शिरोळ 6.5, पन्हाळा 32.6, शाहूवाडी 61, राधानगरी 28.3, करवीर 18.7, कागल 18.5, गडहिंग्लज 14.5, भुदरगड 41.7, आजरा 28.3 आणि चंदगड तालुक्यात 24 मि.मी. असा एकूण 25.6 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.